संगीतकार - कौशल इनामदार
गीतकार - सुरेश भट
To Download This Song :
मराठी अभिमानगीताचा दुवा आपल्याला देत आहे. आपण जरूर ऐकावं, आवडलं तर आपल्या मित्रांनाही तो आनंद द्यावा. मराठीचा अभिमान जागृत करायचा असेल तर एक अहिंसक व्यासपीठ असणंही गरजेचं आहे, आणि संगीतापेक्षा संयुक्तिक माध्यम आणखी काय असू शकतं. अमराठी लोकांना आपल्या भाषेचा आदर करायला सांगण्याआधी मराठी लोकांमध्ये अभिमान जागृत करण्याची अधिक गरज आहे. सुरेश भटांचे शब्द ११२ प्रस्थापित गायक आणि ३५६ समूह गायक अशा ४५० हून अधिक गायकांनी गायलेलं हे गीत बाकी काही नाही तर एक चैतन्य जरूर निर्माण करेल यावर माझा विश्वास आहे. महाराष्ट्रगीताबाबत आपण एक चूक केली. ५० वर्षांमध्ये आपण या गीताशी रोजचा संपर्कही ठेवला नाही. आज मराठीच्या दुरवस्थेला आपली अनास्था हे एक मोठं कारण आहे. ही चूक आपण (मराठी माणसं) मराठी अभिमानगीताबाबतीत करू नये असं मला वाटतं. आपल्या माध्यमातून आपण हे मराठी अभिमानगीत पोचवलंत तर आमच्या कार्याला मदत होईल. धन्यवाद- कौशल इनामदार
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानतो मराठी
दंगते मराठी, रंगते मराठी,
स्पंदते मराठी, गर्जते मराठी
गुंजते मराठी, गर्जते मराठी