संगीतकार - अजय-अतुल
गीतकार - श्रीरंग गोडबोले
To Download This Song :
झळाळती कोटी ज्योती या
तो काळ विसाव्या शतका आरंभीचा
या जगी चित्रपट बनू लागले होते
वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा
हे तंत्र आमुच्या देशी आले नव्हते
पण करुनी ठाम निर्धार योगी वृत्तीने
फाळके ऋषिंनी खडतर व्रत आचरिले
अर्जुनास जैसे लक्ष एकची डोळा
जे अशक्य होते शक्य तयांनी केले
मग कथा घेऊनी हरिश्चंद्र राजाची
या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले
शनिवार तीन मे एकोणिसशे तेरा
भारतभूमीवर चलतचित्र अवतरले
नव तेजाने मने उजळली घडली ऐसी किमया
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या
प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा
बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा
चित्र म्हणा वा फिल्म, सिनेमा, पिक्चर, मुव्ही काही म्हणा
आनंदाचा झोत असे हा संस्कृतीच्या पाऊल खूणा
घटकाभरची करमणूक वा दोन घडीचा विरंगूळा
बघता बघता व्यापून जातो देहभान अमुचे सगळा
रडणाऱ्याचे अश्रू पुसतो लकेर देतो हास्याची
पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची
आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधतसे रेशिम नाते
आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते
जीवाशीवाशी नाळ जोडती लावूनी जाती माया
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या
आता न आम्हा कुणी थांबवा आम्ही घेतला श्वास नवा
पाठीवरती थाप हवी मज धीर हवा आधार हवा
सात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ
उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ
रसीक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू
भव्य दिव्य दृक्श्राव्य कलेचे सर्वाथाने चीज करू
नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघम अन् चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे